Monday, August 25, 2014

देव्याचा ध्यानयोग

ऑफिसमधून मी मरगळलेल्या मनस्थितीत बाहेर पडलो आणि नेहमीप्रमाणे ”बी.के.ज्” च्या दिशेने चालायला लागलो.  दिवसभरात बी.के.ज् मधला हा अर्धा तास हाच काय तो माझ्या थकल्या मनाचा आधार होता.  ह्या प्रचंड दुनियेत, कोट्यवधी माणसांच्या महासागरात मला कुणाशी बोलावेसे वाटत नव्हते.  मी अगदी एकटा पडलो होतो.   मी अतिशय उदास झालो होतो.  माझी झोप उडाली होती.  रात्र रात्र मी तळमळत होतो.  बी.के.ज् ही अशी एकच जागा शिल्लक होती जिथे मी घटकाभर, जुन्या आठवणींना उजाळा देत शांतपणे बसू शकत होतो.

मी बी.के.ज् मध्ये प्रवेश केला आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्व कोपर्‍यांकडे नजर टाकली.  माझ्या दुर्दैवाने आज कोणत्याही कोपर्‍यातले टेबल मोकळे नव्हते.  आजच्या माझ्या मनस्थितीत हा मला बसलेला मोठा धक्का होता.  मोठ्या आशेने मी बी.के.ज् मध्ये आलो होतो.  मला एकांत हवा होता.  दुसर्‍या कोणासमोर जाऊन बसण्याचा (आणि त्याच त्या महाभयानक - ज्याने माझी झोप उडवली होती त्या - विषयावरचा संवाद चालू करण्याचा) धोका निदान बी.के.ज् मध्ये तरी मला पत्करायचा नव्हता.  आता काय करावे ते मला कळेना.  परत फिरून घरी जाण्याच्या नुसत्या विचारानेच माझ्या मनाचा थरकाप उडत होता.  पण आता माझ्यापुढे काही उपाय उरला नव्हता.  थकल्याभागल्या मनाने स्वत:ला फरफटवत मला घरी जाणे भागच होते.  एक शेवटची इच्छा म्हणून, कोपर्‍यातला कुणी लवकर उठण्याची शक्यता आहे काय ते पाहण्यासाठी, मी पुन्हा एकदा आत नजर टाकली आणि त्याच क्षणी डाव्या - माझ्या आवडत्या - कोपर्‍यात छताकडे नजर लावून स्थिरचित्त बसलेल्या एका पुतळ्याने आपला चेहरा माझ्याकडे वळवला आणि मी एकदम दचकलो.  तो देव होता.  हे खरं की देव माझा मित्र होता आणि हेही खरं की तो मला अनेक दिवसांनी भेटत होता, पण हेही तेवढंच खरं होतं की त्यावेळी मला माझ्या त्या हक्काच्या पवित्र कोपर्‍यात कोणी भागीदार नको होता.  शिवाय गेले काही दिवस तो मला टाळायचा प्रयत्‍न करतोय असा मला संशय होता.  त्यामुळेही त्याच्याशी बोलायला जावं की नाही ते मला कळत नव्हतं.  पण देव्यानं मला पाहिलं होतं.  आता मी मागे फिरू शकत नव्हतो.  धडधडत्या छातीनं मी त्याच्या समोरच्या खुर्चीत बसलो आणि बी.के.ज् स्पेशल स्ट्राँग कॉफी मागवली.
“काय चाललंय देव्या?” मी म्हणालो.
यावर त्यानं किंचित त्रासिक चेहर्‍यानं माझ्याकडे पाहिलं.  “काय चाललंय यापेक्षा काय चाललेलं नाही ते महत्त्वाचं आहे!” तो म्हणाला.
मी पुन्हा एकदा दचकलो.  एखाद्या थोर नेत्याच्या थोर पुतळ्याने समोरच्या तुच्छ सामान्य जनतेच्या तोंडावर एखादे सुभाषित फेकावे तसे ते शब्द मला लागले.  पण देव्या असा तुसडा माणूस नाही हे मला माहीत होते, म्हणून मी त्याला त्या वाक्याचा अर्थ विचारण्याचे धाडस केले.
“हुं!” देव्यानं एक उसासा टाकला.  “म्हणजे तुला अर्थ सांगितल्याशिवाय तु इथून हलणार नाहीस तर.” तो म्हणाला.
हा माझा मित्र असून असा का वागतोय ते मला कळेना.  आमच्यात काही भांडणही झालेलं नव्हतं.
“तू टिव्ही पाहतोस ?” त्याने विचारले.
आता मात्र मी कोलमडूनच पडलो.  सदैव वाघाची भीती मनात घेऊन फिरणार्‍या हरणाला पाणी पिताना स्वत:शेजारीच वाघाचे प्रतिबिंब दिसल्यावर त्याची जी अवस्था होईल, त्याहून दुर्धर अवस्था माझी झाली.  समोरच्या कॉफीच्या मगात त्याक्षणी विष असतं तर किती बरं झालं असतं, असा एक विचारही मनात येऊन गेला. ज्याच्यापासून दूर पळण्यासाठी मी बी.के.ज् मध्ये आलो होतो, ज्याने माझी मनस्थिती पार बिघडवून टाकली होती, ज्यामुळे मला निद्रानाशाचा विकार जडला होता तो विषय माझ्या या पवित्र मंदिरात, बी.के.ज् मध्येही माझा पिच्छा सोडत नव्हता. माझ्या अंगातलं उरलंसुरलं त्राणही नाहीसं झालं.  मी टिव्ही पाहतो का ?  गेले कित्येक महिने दिवसाउजेडी, रात्रीअपरात्री, जागेपणी आणि जी काय लागत होती त्या झोपेतही, घरी, दारी, ऑफिसात सगळीकडे मी टिव्हीच पाहत होतो, नव्हे मला टिव्हीच पाहावा लागत होता, मला टिव्हीच ऐकावा लागत होता आणि मला टिव्हीच बोलावा लागत होता.
“टिव्ही !” माझ्या गलितगात्र शरीरातून शेवटचा असावा असा उद्गार बाहेर पडला.
“हूं, टिव्ही.  म्हणजे असं की, मी आत्ता टिव्ही पाहात नाहीये.”  हे म्हणताना देव्याचा चेहरा आनंदाने फुलला होता.
“म्हणजे ?” मला हा काय बोलतोय ते काहीच कळत नव्हतं.  तो आत्ता टिव्ही बघत नाहीये हे उघडच होतं.  या संपूर्ण विश्वात टिव्ही नसणारी बी.के.ज् हीच एकमेव जागा उरली होती.
“म्हणजे मी आत्ता अगदी ठरवून, जाणूनबुजून टिव्ही न पाहण्याचं काम करत आहे.”
आता मात्र मी देव्याकडे जरा संशयाने बघितलं.  वरवर तरी सगळं ठीक दिसत होतं.
“देव्या, असं कशामुळं रे ?”  मला देव्याची काळजी वाटायला लागली.  शेवटी तो माझा मित्रच होता.
“म्हणजे ?”  आता दचकायची पाळी देव्याची होती.
“हे बघ,” मी समजुतीनं म्हणालो, “दिवस हे असे ताणतणावांचे आहेत.  मनावर जास्ती ताण पडला की असं होऊ शकतं.  पण काळजी करू नकोस, आता यावर नवनवीन औषधंही निघाली आहेत.”
“उगीच काहीतरी बोलू नकोस,”  देव्या भडकला.  “मला काही झालेलं नाही.  मी पूर्णपणे ताळ्यावर आहे.  मी काय बोलतोय ते तुला कळत नाहिये.  मी पूर्ण ताळ्यावर राहून, पूर्ण शुद्धीत, नशापाणी न करता, आत्ता टिव्ही पाहात नाहिये.”  तो ठासून म्हणाला.  “माझ्या मते सध्याच्या काळात टिव्ही बघणं यासारखा दुसरा मोठा मूर्खपणा नाही, एवढंच नव्हे तर टिव्ही बघणं यासारखी दुसरी घोर सजा नाही.  टिव्ही आणि अंधारकोठडी यातल्या एकाची जर मला निवड करायची झाली तर शंभर पैकी शंभर वेळा मी दुसर्‍याचीच निवड करीन.”  देव्या आता त्वेषाने बोलत होता.  “त्यामुळे मी टिव्ही बघणं केव्हाच सोडून दिलं आहे, पण मी एवढ्यावरच थांबलेलो नाही.  मी आत्ता, या क्षणी टिव्ही न बघण्याचं विलक्षण सूख भोगत आहे.”
“म्हणजे ?”  मला खरं म्हणजे विलक्षण आनंद झाला होता.  देव्याच्या रूपात मला माझ्या जिवाचा सखा मिळाला होता.  या विश्वात मी एकटाच नव्हतो.  माझ्याबरोबर देव होता.  अचानक माझ्याभोवतालचं विश्वच बदललं.  आतापर्यंत काळंठिक्कर पडलेलं जग मला रंगीबेरंगी दिसायला लागलं होतं. पण तरीही त्याचं बोलणं काही मला कळत नव्हतं.
“म्हणजे असं बघ,” देव्या म्हणाला, “तुझ्या बाबतीत असं घडतं का की, तू ऑफिसातून थकूनभागून घरी जातोस आणि त्यावेळी घरातली सगळी माणसं आणि प्राणी तोंड उघडं टाकून टिव्हीपुढे टक लावून बसलेली असतात आणि तुलासुद्धा झक मारत त्यांच्याबरोबर टिव्हीसमोर बसावं लागतं?”
मी नखशिखांत थरथरलो.  ऑफीस सुटल्यावर थेट घरी न जाता बी.के.ज् मध्ये येण्याचं हेच तर कारण होतं.  मला गेल्या काही वर्षांतले माझे संध्याकाळचे गृहप्रवेश आठवले.  पावणेसात-सातची वेळ.  यावेळेत रिमोटची मालकी बड्या मॉजींकडे, म्हणजे माझ्या आजीकडे.  टिव्हीचा व्हॉल्यूम फुल्ल्ल.  टिव्हीमध्ये एक ढोली बाई तिच्यासारख्याच दिसणार्‍या दुसर्‍या एका ढोल्या बाईबरोबर तारस्वरात किंकाळतीये.  बॅकग्राऊंडला भयाण संगीत.  बड्या मॉजींच्या डाव्या-उजव्या बाजूला पितॉजी आणि छोट्या मॉजी.  पलीकडे तासाभराने सुरू होणारी दुसरी एक मालिका बघण्यासाठी आतापासूनच ठिय्या देऊन बसलेल्या सुनबाई आणि जे कोणी जे काही लावेल ते पापणीही न लववता बघत डोक्याखाली मोठ्या उशा घेऊन गालिच्यावर लोळत पडलेली आमची दोन शालेय रत्‍नं.  ते दृश्य आठवलं आणि माझ्या अंगावर काटा आला.
“होय, होतं असं,” मी थकल्या सुरात कसाबसा म्हणालो.
देव्या माझ्याकडे बारीक नजरेने बघत होता.  “आणि हा प्रसंग अत्यंत यातनादायी असतो हे तुला पटतं का?”
“होय.”  कुठल्याही विचारी माणसाला पटेल असंच देव्याचं बोलणं होतं.  पण दुर्दैवाने या संपूर्ण दुनियेत आम्ही दोघेच काय ते विचारवंत उरलेले दिसत होतो.
“पण असं बघ, टिव्ही बघणं अत्यंत यातनादायी आहे म्हणून टिव्ही बघू नये, हा एक केवळ निष्क्रीय विचार झाला.  मी त्याच्याही पुढे जाऊन, जाणूनबुजून टिव्ही न बघण्यात जे प्रचंड सुख आहे ते मिळवण्याचं सक्रिय काम करतो.  जेव्हा तू आत्ता माझ्यासमोर येऊन बसलास, तेव्हा मी माझ्या घरच्यांबरोबर टिव्ही न बघण्याचं विलक्षण सुख उपभोगत होतो.  तेव्हा आता मी तुझा जास्ती वेळ घेत नाही.  माझी आता माझ्या आजीची दुसरी आवडती मालिका ‘दुनियाको छोड तेरी गली आई रे’ बघण्याची वेळ झालेली आहे.”
एवढं बोलून देव्या  बी.के.ज् मधल्या त्या खास, दुनियेतल्या कोणत्याही माणसाच्या किंवा कोणत्याही कणावान प्राण्याच्या कण्याला आपोपाप जुळवून घेऊ शकणार्‍या मऊसूत सोफ्यावर मागे रेलला आणि आढ्याकडे नजर लावून समाधिस्थ झाला.  पण आता माझी उत्सुकता फारच ताणली गेली होती.  देव्याला नक्की काय म्हणायचंय ते माझ्या थोडं थोडं लक्षात आलं होतं, पण टिव्ही न बघण्यातलं प्रचंड सुख मिळवण्याचं सक्रिय काम तो कसं काय करतो ते मला कळलं नव्हतं.  मी हाक मारून, चमच्याने टेबलावर टकटक करून देव्याला समाधीतून जागे करण्याचा प्रयत्‍न केला, पण त्याची समाधी काही भंगली नाही.  शेवटी मी एक काटा त्याच्या पोटात खुपसला तेव्हा तो दचकून जागा झाला.
“अरे, तू अजून गेला नाहीस ?”  तो वैतागून म्हणाला.
“देव्या, अरे तुला काय सांगू या टिव्हीमुळे माझी काय दैना झाली आहे ती!  गड्या, किती दिवस मी याच सुखासाठी तळमळतोय रे!  मलाही तुझ्या या सुखात सामील करून घे.  टिव्ही न बघण्यातलं प्रचंड सुख मिळवण्याचं सक्रिय काम कसं करायचं ते मलाही शिकव.”  मी देव्याची आर्जवं केली.
माझ्या स्वरातली वेदना देव्याला जाणवली असावी.  माझ्याकडे कनवाळू नजरेने पाहत तो म्हणाला, “सांगतो.  त्याचं असं झालं, एक दिवस माझ्या असं लक्षात आलं की, आपल्याला आयुष्याचा अत्यंत उबग आलेला आहे.  आल्या दिवसाचं ओझं ओढताना आपली पुरती दमछाक होते आहे.  जिवंतपणीच आपण नरकयातना भोगत आहोत.  लाखो माणसांत राहूनही आपली अवस्था अंधारकोठडीत कोंडलेल्या एकट्या कैद्यासारखी झालेली आहे.  आपण अगदी एकटे एकटे पडलेलो आहोत.  पुष्कळ विचारांती माझ्या असं लक्षात आलं की, या सगळ्याचं मूळ हे त्या टिव्हीमध्ये दडलेलं आहे.  चांगलं जितंजागतं झाड पोखरून शुष्क करून टाकणार्‍या किड्याप्रमाणे हा टिव्ही आपल्याला पोखरून टाकत आहे.  जिथे जाईन तिथे हा ब्रह्मराक्षस आपल्या पाठीमागे लागलेला आहे.  नरकात म्हणे जसं एका उकळत्या तेलाच्या कढईतून दुसर्‍या उ.ते.च्या कढईत टाकतात, तसं माझं आयुष्य म्हणजे एका सिरीयल मधून दुसर्‍या सिरीयल मध्ये, एका क्रिकेट मॅच मधून दुसर्‍या क्रिकेट मॅचमध्ये, एका बातमीतून दुसर्‍या बातमीमध्ये टाकून तळून काढलं जात आहे.”
क्षणभर देव्या थांबला.  तेवढ्या वेळात माझ्या डोळ्यांसमोरून गेल्या काही महिन्यांत माझ्या वाट्याला आलेल्या उ.ते.च्या कढया येऊन गेल्या.
“माझ्या असं लक्षात आलं,” देव्या पुढं म्हणाला, “की संध्याकाळच्या वेळी थकून-भागून घरी परत गेल्यावर टिव्ही बघत बसणे म्हणजे उकळत्या तेलात तळून निघण्याची शिक्षा मिळाल्यासारखंच आहे.  या यातनांवर उपाय काय?  तर आपण होऊन उकळत्या तेलात जाऊन न पडणे हा!  पण माझं मन तेवढ्यावरच थांबलं नाही.  आपण आत्ता उकळत्या तेलात तळून निघत नाही आहोत, या माझ्या मनात आलेल्या विचाराने माझ्या अंतर्मनाला विलक्षण गुदगुल्या झाल्या आणि मला अक्षय्य सुखाची वाट सापडली.  म्हणूनच मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे, जाणूनबुजून टिव्ही न बघण्यात जे प्रचंड सुख आहे ते मिळवण्याचं सक्रिय काम मी करतो.  आता असं बघ, ही वेळ आहे माझ्या आजीची दुसरी आवडती मालिका ‘दुनियाको छोड तेरी गली आई रे’ ची.  ही मालिका मी आत्ता नुसतीच बघत नाहिये, तर पंचवीस स्टेनलेस स्टीलची ताटं आणि पन्नास तेलाचे पत्र्याचे डबे बडवल्यानंतर निर्माण झालेल्या आवाजात कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज मिसळून तयार झालेलं त्याचं शीर्षकगीतही ऐकत नाहिये.  अरे, ही या पृथ्वीतलावरची सुखाची परमावधी आहे!”
बोलता बोलता देव्या सोफ्यावर मागे रेलला आणि त्याने डोळे मिटले.
“अशोकवनात सीतेच्या पहार्‍यावर असलेल्या लंकेच्या राक्षशिणीप्रमाणे दिसणारी ती हिरोची महाभयानक आई तारस्वरात किंचाळताना मी पाहात नाहिये,” तो पुढे म्हणाला. “आणि तिचं किंचाळणं संपल्यावर दिसणारे इतर राक्षशिणींचे क्षणार्धात काळेपांढरे पडणारे भलेमोठे थोबडेही मी पाहात नाहिये.”
मी नखशिखांत शहारलो.  काय विलक्षण सुख होतं हे!
मीदेखील सोफ्यावर मागे रेललो आणि डोळे मिटून घेतले.  “आणि ह्या महाभयानक दृश्यांना पार्श्वसंगीत म्हणून वापरला जाणारा घसा बसलेल्या डुकराच्या किंचाळण्याचा आवाजही मी ऐकत नाहिये.”  मी म्हणालो.
“आणि शाईस्तेखानाच्या सैन्यातल्या एखाद्या गोर्‍या हबश्यासारखा दिसणारा गेंगाण्या आवाजाचा तो कुरुप नायकही मी पाहात नाहिये,” देव्या म्हणाला.
“आणि त्या नायकाच्या कुठलातरी रोग पडलेल्या भोपळ्यासारख्या चेहर्‍याच्या बापाची कानठळ्या बसवणार्‍या आवाजातली एंट्रीही मी पाहात नाहिये,” मी म्हणालो.
“आणि... आणि... रोजच्या त्याच त्याच संवादांनी मी शब्दबंबाळही होत नाहिये,” देव्या म्हणाला.
“आणि आता माझ्या बायकोची लाडकी ‘सखी शेजारिणी तु फसत राहा...’ ही विनोदी म्हणवली जाणारी केविलवाणी मालिका सुरू होताना मी पाहात नाहिये,” मी म्हणालो.
देव्याचा कंठ क्षणभर रुद्ध झाला.  अतिसुखाने त्याचा आवाजच फुटेना.  बहुधा ही त्याच्याही बायकोची लाडकी मालिका असावी.
“आणि त्यातल्या अतिभयंकर विनोदांवर खिंकाळणारी बायको आणि पोरं, यात काय विनोद होता हे न कळल्यामुळे गप्प बसलेल्या माझ्याकडे, मेलेल्या पालीकडे बघावं तशी बघत नाहियेत,” देव्या म्हणाला.
“आणि... आणि...,” मी म्हणालो.
“आणि... आणि...,” देव्या म्हणाला.
“आणि... आणि...,” मी म्हणालो.
“घुर्र... घुर्र...,” देव्या म्हणाला.
“घुर्र... घुर्र...,” मी म्हणालो.
बी.के. हे खरोखरच एक थोर व्यक्तिमत्त्व आहे.  त्यांनी आम्हाला त्या ध्यानमग्न अवस्थेतून अजिबात जागं केलं नाही.
खरं सांगतो, गेल्या कित्येक महिन्यांत अशी शांत झोप मला लागली नव्हती. 


(P.G. Wodehouse यांच्या The secret pleasures of Reginald वर आधारित)

No comments:

Post a Comment